अध्यक्षांच्या लेखणीतून
आभाळाखालची शाळा : सीमांच्या पलीकडे मराठी माणसांना जोडणारा एक भाषिक प्रवास
– दिलीप पुराणिक
काही उपक्रम आपण ठरवून सुरू करतो, तर काही उपक्रम आयुष्य आपल्याला अनपेक्षितपणे देत असलेल्या अनुभवांतून जन्माला येतात. 'आभाळाखालची शाळा' हा माझ्यासाठी असाच एक प्रवास आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मराठी माणसांना पुन्हा आपल्या भाषेशी जोडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
माझा मूळ प्रवास शिक्षण, लेखन आणि करिअर मार्गदर्शनाचा. बी.कॉम. आणि एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ नोकरी केली. मात्र, स्वतंत्रपणे काहीतरी करण्याची इच्छा असल्याने 'लास्ट ओव्हर पब्लिकेशन' या संस्थेची स्थापना केली. करिअर मार्गदर्शन या विषयावर १३ पुस्तके लिहिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो महाविद्यालयांमध्ये व्याख्याने दिली. लाखो विद्यार्थ्यांपर्यंत करिअरविषयक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आयुष्याने एक वेगळेच वळण घेतले. कोरोनाच्या काळात मला पॅरालिसिसचा त्रास झाला. शारीरिक मर्यादांमुळे बाहेर फिरणे, व्याख्याने आणि प्रवास थांबला. त्यामुळे घरात राहून इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांचा शोध घेण्याचा एक नवा छंद जडला.
संपूर्ण लेख वाचा ↓लेख लहान करा ↑
याच शोधादरम्यान पाकिस्तानमधील विशाल राजपूत नावाच्या एका मराठी व्यक्तीशी माझा संपर्क झाला. त्यांच्याशी संवाद साधताना एक विलक्षण वास्तव समोर आले. पाकिस्तानमधील कराची आणि इतर भागांत आजही मराठी कुटुंबे आहेत. त्यांच्या घरांमध्ये मराठीची काहीशी परंपरा टिकून आहे; मात्र नव्या पिढीचा मराठीशी संपर्क जवळजवळ तुटला आहे.
विशाल यांच्याशी बोलताना मी त्यांना विचारले, ''तुम्हाला आमच्याकडून नेमकी काय मदत हवी आहे?'' त्यांचे उत्तर मनाला भिडणारे होते. ते म्हणाले, ''आमच्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी काहीतरी करा. आमच्या आजी-आजोबांना मराठी येते; आमच्या पिढीला थोडीफार येते. पण आमच्या मुलांना मराठीच समजत नाही.''
त्या एका संवादाने माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली. आम्ही मराठी शिकवण्याचे ऑनलाइन वर्ग सुरू केले. सुरुवातीला हा एक छोटासा प्रयत्न होता; पण पुढे त्याचे एका मोठ्या चळवळीत रूपांतर होईल, याची कल्पनाही नव्हती.
'आभाळाखालची शाळा' हे नाव कसे सुचले?
या उपक्रमाला नाव देताना मला पारंपरिक शाळेची चौकट नको होती. या शाळेला इमारत नाही, वर्गखोली नाही, ठरावीक इयत्ता नाहीत आणि वयाची मर्यादाही नाही. येथे मोकळ्या मनाने संवाद साधता येतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारा मराठी माणूस या शाळेचा विद्यार्थी होऊ शकतो. म्हणूनच आम्ही या उपक्रमाला 'आभाळाखालची शाळा' हे नाव दिले.
माझी पत्नी माधुरी पुराणिक या संगीत शिक्षिका आहेत. त्यांनी मराठी शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली. अक्षरओळख, बाराखडी, जोडाक्षरे, छोटे शब्द, वाचन आणि लेखन अशा अगदी प्राथमिक टप्प्यापासून त्यांनी वर्ग सुरू केले. माझी मुलगी श्रुती महिलांसाठी स्वतंत्र गट सांभाळते. त्यामध्ये मराठी गाणी, कविता, साहित्य आणि सांस्कृतिक संवाद यांचा समावेश असतो. माझा मुलगा स्वप्नील संपूर्ण तांत्रिक व्यवस्था सांभाळतो. मी स्वतः या सर्व उपक्रमांचे समन्वयन, मार्गदर्शन आणि पुस्तकांची उपलब्धता याकडे लक्ष देतो.
आमच्यासोबत अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि मराठीप्रेमी व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. डॉ. शोभना देशमुख, सुधासाताई साठे, प्राध्यापक टाक सर, शेखर पाटील अशा अनेकांचे सहकार्य आम्हाला लाभत आहे.
पाकिस्तानपासून जगभरापर्यंतचा विस्तार
पाकिस्तानमधील मराठी कुटुंबांची परिस्थिती समजून घेताना जाणवले की, भाषेचा प्रश्न केवळ शब्दांचा नाही; तो सांस्कृतिक ओळखीचाही आहे. अनेक कुटुंबांमध्ये मराठी बोलली जाते, मात्र तिच्यावर उर्दू, अरबी आणि इतर भाषांचा प्रभाव आहे. काहींना मराठी वाचता-लिहिता येत नाही. त्यांच्या मुलांना तर मराठीची अक्षरओळखही नाही.
आम्ही महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणक्रमाच्या आधारे त्यांना शिकवायला सुरुवात केली. हळूहळू बहरीन, मॉरिशस, अमेरिका, कॅनडा, इस्रायल, पोर्तुगाल, युगांडा, मलेशिया, दुबई आणि इतर देशांमधील मराठी कुटुंबेही आमच्याशी जोडली गेली. आज ७० हून अधिक देशांमधील सुमारे ६० हजार मराठी व्यक्तींपर्यंत आमचा संपर्क पोहोचला आहे.
आमच्या वर्गांमध्ये ७-८ वर्षांच्या मुलांपासून ते ९० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील विद्यार्थी आहेत. हीच या शाळेची खरी ताकद आहे.
भाषेबरोबर संस्कृतीचेही जतन
आमचा प्रयत्न केवळ मराठी शिकवण्यापुरता मर्यादित नाही. मराठी भाषा ज्या संस्कृतीतून जन्माला आली, त्या संस्कृतीशीही या कुटुंबांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गणेशोत्सव, संक्रांत, होळी, महालक्ष्मीचे पूजन, मराठी गाणी, अभंग, पोवाडे, संत साहित्य, शिवाजी महाराजांचा इतिहास, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अशा विविध विषयांवर आम्ही ऑनलाइन कार्यक्रम घेतो. महाराष्ट्रातील देवस्थानांचे थेट दर्शन घडवतो. सण-समारंभातील परंपरा आणि विधींबाबत त्यांच्या शंकांचे निरसन करतो.
पाकिस्तानमधील अनेक कुटुंबे आजही मराठी परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही केवळ शिक्षक नाही, तर कुटुंबातील सदस्य आहोत. तिथले अनेकजण मला काका, मामा किंवा आजोबा म्हणून हाक मारतात. या नात्यांमधूनच या उपक्रमाचे भावनिक महत्त्व समजते.
आम्ही कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयात पडत नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील नागरिक म्हणून प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान आहे. आमचा एकच समान धागा आहे – मराठी भाषा.
पुढील वाटचाल : भाषेपासून करिअरपर्यंत
आता या उपक्रमाला आणखी व्यापक स्वरूप देण्याचा माझा मानस आहे. परदेशात वाढणाऱ्या मराठी मुलांना मराठी भाषेचे फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देण्याबरोबरच फ्रेंच, जर्मन, रशियन आणि इंग्रजीसारख्या जागतिक भाषांचे अभ्यासक्रमही सुरू करण्याचा आमचा विचार आहे. मराठी माणसाने जगभरात संधी शोधाव्यात; मात्र आपल्या भाषेशी असलेले नातेही टिकवावे, ही त्यामागची भूमिका आहे.
जगभरातील मराठी साहित्यिक, कवी, कलाकार, उद्योजक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना एका व्यासपीठावर आणून स्नेहसंमेलन आयोजित करण्याची आमची योजना आहे. पुण्यात अशा जागतिक मराठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजनही आम्ही केले आहे.
पाकिस्तानमधील मराठी कुटुंबांसाठी प्राथमिक स्तरावरील मराठी पुस्तके, वाचनालय आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र उपलब्ध व्हावे, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. कराचीमधील 'शिवाजी कोर्ट' ही जागा महाराष्ट्र पंचायतला सांस्कृतिक उपक्रमांसाठी उपलब्ध व्हावी, अशी आमची मागणी आहे. तसेच या कुटुंबांना महाराष्ट्रात येऊन गड-किल्ले, पंढरपूर, तुळजापूर आणि जेजुरी यांसारखी स्थळे पाहण्याची संधी मिळावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे.
माझी एकच अपेक्षा...
'आभाळाखालची शाळा' हा कोणत्याही आर्थिक लाभासाठी सुरू केलेला उपक्रम नाही. आजपर्यंत आम्ही कोणाकडूनही शुल्क किंवा निधी न घेता हे काम सुरू ठेवले आहे. माझ्या कुटुंबाने, सहकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी दिलेला वेळ हेच आमचे भांडवल आहे.
महाराष्ट्रातील मराठीप्रेमींना माझे एकच आवाहन आहे. आम्हाला मोठ्या आर्थिक मदतीची गरज नाही. तुम्ही अर्धा तास वेळ द्या, एखादे छोटे मराठी पुस्तक द्या, तुमची कविता, गाणी किंवा गोष्टी या मुलांपर्यंत पोहोचवा. या मुलांशी संवाद साधा. त्यांना मराठी शिकण्यास मदत करा.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे निश्चितच आनंदाचे आहे. मात्र भाषा केवळ दर्जामुळे जिवंत राहत नाही. ती बोलली गेली, वाचली गेली, शिकवली गेली आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली तरच टिकते.
माझे स्वप्न आहे की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या मराठी मुलाला अभिमानाने सांगता आले पाहिजे – ''मी मराठी आहे!''
कारण मराठी ही केवळ आपली भाषा नाही; ती आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि माणुसकीशी जोडणारी आपली ओळख आहे. आणि ही ओळख जपण्यासाठीच 'आभाळाखालची शाळा' अखंड सुरू राहणार आहे.








